नागपूर, 07 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रातील नागपुरात मंगळवारी ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) चे दोन रुग्ण आढळले आहेत. हे रुग्ण 13 आणि 7 वर्षांच्या दोन मुली आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मुलींना दोन दिवसांपासून सतत ताप होता. त्यानंतर त्यांनी खासगी लॅबमध्ये चाचणी केली, ज्यामध्ये त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मुलींना खोकला आणि तापाचा त्रास होता. परंतू या दोन्ही मुलींना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नव्हती आणि दोन्ही रुग्ण बरे झाले आहेत. त्यांचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) पाठवण्यात आले आहेत.
केंद्राच्या राज्यांना सूचना
एचएमपीव्ही आजाराबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना सूचना जारी केल्या आहेत. यासंदर्भात फक्त अधिकृत माहितीच प्रसिद्ध केली जावी आणि कोणत्याही काल्पनिक गोष्टींना वाव देऊ नये. एचएमपीव्ही हा नवीन विषाणू नाही. तो यापूर्वी देखील अस्तित्वात होता आणि तो सध्या पुन्हा सक्रिय होत आहे, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. तसेच याबाबत लवकरच नियमावली जाहीर केली जाईल. राज्याच्या आरोग्य विभागाने एक ॲडव्हायझरी जारी करून जिल्हा प्रशासनाला सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णांवर पाळत ठेवण्यास आणि त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्यास आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.
एचएमपीव्ही चे भारतात रुग्ण
भारतात आतापर्यंत एचएमपीव्ही आजाराचे 10 रुग्ण आढळले आहेत. ज्यामध्ये कोलकाता सर्वाधिक 3 रुग्ण, बेंगळुरू, चेन्नई आणि नागपूर प्रत्येकी 2 रुग्ण, तर गुजरातमध्ये 2 रुग्ण आढळले असल्याची पुष्टी झाली आहे. एचएमपीव्ही हा एक संसर्गजन्य आजार आहे. हा विषाणू लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांसाठी अधिक धोकादायक ठरतो. एचएमपीव्ही आजाराची सर्दी, खोकला, घसा खवखवणे, ताप येणे आणि अंगदुखी यांसारखी प्रमुख लक्षणे आहेत. तर गंभीर प्रकरणांमध्ये यामुळे ब्रॉन्कायटिस किंवा न्यूमोनिया होण्याचा धोका असतो. त्यामुळे एचएमपीव्ही चा संसर्ग टाळण्यासाठी मास्क वापरणे, हातांची स्वच्छता राखणे, हात साबण आणि पाण्याने स्वच्छ धुणे आणि संसर्ग झालेल्या व्यक्तींशी संपर्क टाळणे हे महत्त्वाचे आहे. दरम्यान, एचएमपीव्ही विषाणूबद्दल घाबरण्याचे कारण नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे, मात्र नागरिकांनी सर्दी-खोकल्याची लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.