मुंबई, 10 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील ऊर्जा विभागातील कंत्राटी कामगारांच्या वेतनात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.09) मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात एक बैठक पार पडली. या बैठकीला ऊर्जा विभागामधील कंत्राटी कामगारांच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी, मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार चंद्रशेखर बावनकुळे आणि विविध अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत ऊर्जा विभागातील महानिर्मिती, महापारेषण, महावितरण कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या वेतनात 19 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
https://x.com/Dev_Fadnavis/status/1833173446970241111?s=19
कर्मचाऱ्यांना मेडिक्लेमची सुविधा लागू
तसेच यावेळी महानिर्मिती कंपनीतील कामगारांनी ई.एस.आय.सी.ची वेतन मर्यादा ओलांडली असल्याने आता ऊर्जा विभागाच्या सर्व कंपन्यातील कंत्राटी कामगारांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या मेडिक्लेमची सुविधा लागू करण्यात येत असल्याचेही जाहीर करण्यात आले. दरम्यान, कंत्राटी कामगारांच्या मूळ पगारात वाढ केल्यामुळे आता महाराष्ट्रातील ऊर्जा विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचे वेतन हे अन्य राज्यातील कंत्राटी कामगारांपेक्षा सर्वांत जास्त झाले आहे.
त्या कर्मचाऱ्यांबाबत चर्चा करून निर्णय घेणार
दरम्यान, आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांबाबतची भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केली. “लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. परंतु, खापरखेडा पॉवर स्टेशनमध्ये झालेल्या आंदोलनात मारामारी, पॉवर स्टेशन बंद पाडणे आदी बाबी राज्य सरकारला मान्य नाहीत. त्यामुळे ज्या कंत्राटी कामगारांवर आंदोलनासंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशा कंत्राटी कामगारांबाबत विचारपूर्वक चर्चा करून निर्णय घेतला जाईल,” असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.