पुणे, 25 जुलैः (विश्वजीत खाटमोडे) गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील बहुतांश धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे या धरणांतून सध्या पाण्याचा विसर्ग केला जात आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यातील भोर आणि पुरंदर तालुक्यात देखील गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे या परिसरातील नीरा देवघर, भाटघर व गुंजवणी तसेच वीर धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. या पावसामुळे पुरंदर तालुक्यातील वीर धरण गुरूवारी (दि. 25 जुलै) सकाळी 6 वाजता 85.55 टक्के भरले असल्याची माहिती नीरा उजवा कालवा फलटण विभागाचे कार्यकारी अभियंता शि. दि. जाधव यांनी दिली आहे.
https://x.com/Info_Pune/status/1816292299371860050?s=19
https://x.com/Info_Pune/status/1816360611829235794?s=19
नीरा नदीकाठच्या गावांना इशारा
वीर धरणात सध्या मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा झाला आहे. तसेच याठिकाणी पावसाचा जोर पाहता वीर धरणाच्या सांडव्यामधून आज नदी पात्रात 13 हजार 911 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच धरणामध्ये जमा होणाऱ्या पाण्याच्या आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने नदीमध्ये विसर्ग वाढवण्यात येईल, माहिती माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. या पार्श्वभूमीवर, वीर धरणाच्या खालील बाजूस असलेल्या नीरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तरी नीरा नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेऊन कोणत्याही प्रकारची जिवीत व वित्तहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
https://x.com/Info_Pune/status/1816308796299567399?s=19
मुळशी धरणातून पाण्याचा विसर्ग होणार
दरम्यान, पुणे जिल्ह्यात सध्या सर्वत्र तुफान पाऊस पडत आहे. त्यामुळे पुणे शहर आणि परिसरातील धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत चालली आहे. पुणे शहरातील खडकवासला धरणातून 40 हजार नदीपात्रात क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तसेच वडीवळे धरणाच्या सांडव्यावरून कुंडलीकानदी पात्रात 10 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर आज सकाळी 7 वाजेपर्यंत मुळशी धरण 69.75 टक्के भरले होते. या पार्श्वभूमीवर, मुळशी धरणातून आज दुपारी 2 वाजता 2 हजार 500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीपात्रात कोणीही उतरू नये. नदीपात्रात तत्सम साहित्य किंवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. तसेच या परिसरातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन मुळशी धरण प्रमुख बसवराज मुन्नोळी यांनी केले आहे.