राज्यातील 13 लाख 45 हजार शेतकरी ‘या’ योजनेसाठी पात्र

मुंबई, 25 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने मंजूर केलेल्या नमो किसान महासन्मान योजनेचा पहिला हप्ता लवकरच मिळणार आहे. हा हप्ता प्रधानमंत्री किसान योजनेच्या हप्त्यासोबतच मिळणार आहे. यासंदर्भातील माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. या लाभार्थी शेतकऱ्यांच्या ई-केवायसी आणि इतर अटींच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र शासनाकडून ऑगस्ट महिन्यापासून विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत राज्यातील आणखी 13 लाख 45 हजार शेतकरी पीएम किसान आणि नमो शेतकरी महा सन्मान योजनेसाठी कायमस्वरूपी पात्र ठरले आहेत. याबाबत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

“प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पी एम किसान योजना व राज्य शासनाची नमो किसान महासन्मान योजना या दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी व अन्य अटींची पूर्तता करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील लाखो पात्र लाभार्थी वंचित राहतील, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने कृषी विभागाच्या माध्यमातून ई-केवायसी पूर्ण करणे, भूमिअभिलेख नोंदी अद्ययावत करणे, आधार बँक खात्याशी संलग्न करणे आदी अटींची पूर्तता करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात ऑगस्ट महिन्यापासून एक विशेष मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेच्या माध्यमातून आतापर्यंत 9.58 लाख शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे, 2.58 लाख शेतकऱ्यांचे आधार बँक खात्याशी संलग्न करणे तसेच 1.29 लाख शेतकऱ्यांच्या भूमिअभिलेख नोंदी अद्ययावत करण्यात आल्या आहेत. आता हे सर्व 13 लाख 45 हजार शेतकरी पी एम किसान व नमो किसान महासन्मान योजनेच्या लाभास पात्र ठरले आहेत. ही मोहीम अजूनही सुरूच असून, योजनेतील एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल”, असे यामध्ये धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

वर्ल्डकपमध्ये डी कॉकची बॅट तळपली, पोहोचला अव्वल स्थानी

दरम्यान, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील लाभार्थी शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी 3 हप्त्यांत एकूण 6 हजार रुपये मिळणार आहे. यामध्ये 2 हजार रुपयांचा एक हप्ता असणार आहे. तर या पहिल्या हप्त्यासाठी राज्य सरकारने 1720 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीचे वितरण थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केले जाणार आहे.

माजी मुख्यमंत्र्यांचा कार अपघात, थोडक्यात बचावले

One Comment on “राज्यातील 13 लाख 45 हजार शेतकरी ‘या’ योजनेसाठी पात्र”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *