नवी मुंबई, 14 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बेकायदेशीरपणे राहणाऱ्या आणि गुन्हेगारी कारवायांमध्ये गुंतलेल्या नायजेरियन नागरिकांविरोधात मोहीम सुरू केली होती. त्यानुसार, नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ड्रग्ज व्यवसायात सहभागी झाल्याबद्दल 13 आफ्रिकन नागरिकांना अटक केली आहे. त्याचबरोबर पोलिसांनी बनावट पासपोर्ट बाळगल्याबद्दल आणि व्हिसाशिवाय देशात राहिल्याबद्दल 3 जणांना अटक केली आहे. यासोबतच ज्यांच्या पासपोर्टची वैधता किंवा व्हिसाची मुदत संपली आहे अशा 73 लोकांनाही तात्काळ देश सोडण्याची नोटीस पोलिसांकडून देण्यात आली आहे.
https://x.com/ANI/status/1867793840205365722?t=owijxekrRY6Oaaa90Jw87w&s=19
एकूण 16 जण अटकेत
यावेळी पोलिसांनी मुंबईतील अनेक भागांत छापे टाकले. या कारवाईत पोलिसांनी नायजेरियन नागरिकांकडून सुमारे 12 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत. त्यावेळी पोलिसांनी 13 जणांना अटक केली. तसेच तिघांना बनावट पासपोर्ट बाळगणे आणि व्हिसाशिवाय राहिल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. ते सर्वजण नायजेरिया देशाचे नागरिक आहेत. अटक केल्यानंतर त्यांना खारघर पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. सध्या त्यांची चौकशी केली जात आहे. नवी मुंबई गुन्हेचे सहायक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांनी ही माहिती दिली.
12 कोटींचे ड्रग्ज जप्त
पोलीस आयुक्तालयाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, अंमली पदार्थ विरोधी सेल आणि नवी मुंबई गुन्हे शाखेच्या आर्थिक गुन्हे शाखेने संयुक्तपणे गुरूवारी (दि.12) रात्री ही कारवाई केली. त्यावेळी पोलिसांकडून 25 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. या मोहिमेत पोलीस आयुक्तालयातील एकूण 150 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. या कारवाईत त्यांनी जवळपास 10.22 कोटी रुपये किमतीचे 2 किलो 45 ग्रॅम कोकेन जप्त केले. तसेच अंदाजे 1.48 कोटी रुपयांची 663 ग्रॅम एमडी पावडर, अंदाजे 11.60 लाख रुपयांचे 58 ग्रॅम मिथिलीन, अंदाजे 3.45 लाख रुपयांचा 23 ग्रॅम चरस आणि अंदाजे 6 हजार रुपये किमतीचा 31 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.