पुणे, 11 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये होणाऱ्या 12 वीच्या परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाईन उपलब्ध केली आहेत. सर्व विद्यार्थ्यांना 10 जानेवारी 2025 पासून प्रवेशपत्र मंडळाच्या http://www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध होईल. या संदर्भात काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास शाळा आणि महाविद्यालयांनी संबंधित विभागीय मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केले आहे. याबाबत सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. दरम्यान, इयत्ता बारावीची तोंडी परीक्षा 24 जानेवारी पासून, तर लेखी परीक्षा 11 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
महत्त्वाच्या सूचना:
शाळा किंवा महाविद्यालयांनी प्रवेशपत्र प्रिंट करून विद्यार्थ्यांना देणे आवश्यक आहे, त्यावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांचा शिक्का आणि स्वाक्षरी असणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशपत्राचे कोणतेही अतिरिक्त शुल्क देण्याची आवश्यकता नाही, असे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे. जर विद्यार्थ्यांचे नाव, आईचे नाव किंवा जन्मतारीख चुकीची असेल, तर ते ऑनलाइन अर्ज सुधारणा लिंकद्वारे दुरूस्त करू शकतील. दुरुस्ती संबंधित शुल्क भरून सुधारित माहिती विभागीय मंडळाकडे पाठवून त्याची मान्यता प्राप्त करणे आवश्यक आहे.
जर विद्यार्थ्यांचा फोटो खराब असेल, तर त्याजागी दुसरा चांगला फोटो चिकटवून मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांनी प्रवेशपत्रावर शिक्का व स्वाक्षरी करावी लागेल. जर विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र गहाळ झाले, तर शाळा किंवा महाविद्यालयाने लाल शाईने व्दितीय प्रत (Duplicate) असा शेरा देऊन दुसरे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना देणे आवश्यक आहे. फेब्रुवारी-मार्च 2025 मधील इयत्ता 12 वीच्या परीक्षेसाठी नोंदणीकृत सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक किंवा प्राचार्य आणि सर्व शाळा व महाविद्यालयांनी वरील सर्व सूचनांचे पालन करून त्यानुसार योग्य कार्यवाही करावी, असे निर्देश राज्य शिक्षण मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिले आहेत.