पिंपरी चिंचवड येथील एका शाळेत 12 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ, पीटी शिक्षकासह 8 जणांना अटक

निगडी, 24 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) पिंपरी चिंचवड येथील एका शाळेतील पीटी शिक्षकाने एका 12 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी पीटी शिक्षकाला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. निगडी परिसरातील किर्ती विद्यालयात हा प्रकार घडला आहे. दरम्यान, या शाळेतील हा आरोपी पीटी शिक्षक 12 वर्षीय मुलीला अयोग्य पद्धतीने स्पर्श करत होता. याचा या मुलीला त्रास होत होता. या प्रकाराची माहिती मुलीने तिच्या पालकांना दिली. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी त्या शिक्षकाच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी या पीटी शिक्षकाला अटक केली.

https://x.com/ANI/status/1827244364990398843?s=19

एकूण आठ जणांना अटक

दरम्यान, या पीटी शिक्षकावर यापूर्वी अशाच प्रकारचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणात त्याने शिक्षा देखील भोगली होती. तरीही या शाळा आणि संस्थेने या शिक्षकाला कामावर ठेवल्यामुळे या संस्थेचे सदस्य आणि शाळेच्या मुख्याध्यापकांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणात आरोपी शिक्षकासह एकूण 8 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या याप्रकरणात त्यांची चौकशी केली जात आहे. दरम्यान, याप्रकरणी आरोपी पीटी शिक्षकाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याची माहिती निगडी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी दिली आहे.

अशाप्रकारच्या घटनांमध्ये वाढ

काही दिवसांपूर्वी कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याची घटना घडली आहे. तसेच बदलापूर येथील शाळेतील चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. अशा घटनांमुळे देशभरात सध्या संताप व्यक्त केला जात आहे. अशातच पिंपरी चिंचवड येथील एका खाजगी शाळेत विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाची घटना समोर आल्यामुळे सध्या चिंता व्यक्त केली जात आहे. अशा नराधमांना तातडीने कठोरातील कठोर शिक्षा केली पाहिजे, अशी मागणी सध्या विविध स्तरांतून केली जात आहे. अशा घटनांमुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *