गडचिरोली, 18 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) गडचिरोली जिल्ह्यातील वांडोली येथील जंगलात पोलीस दल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. पोलिसांच्या या कारवाईत 12 नक्षलवादी ठार झाले आहेत. यावेळी नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याकडून एके 47 सह अनेक स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. या चकमकीत उपनिरीक्षक सतीश पाटील हे जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, सतीश पाटील यांच्या डाव्या खांद्यावर गोळी लागली आहे. सध्या त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे. दरम्यान या कारवाईबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाईत सहभागी झालेल्या पोलिसांना 51 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
https://x.com/ANI/status/1813595679480222027?s=19
https://x.com/ANI/status/1813555927515074876?s=19
मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
वांडोली गावाजवळ 12 ते 15 नक्षलवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या C-60 पथकाने बुधवारी दुपारी याठिकाणी कारवाई करून 12 नक्षलवाद्यांना ठार केले. यावेळी पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात सुमारे 6 तास चकमक सुरू होती. या कारवाई दरम्यान काही नक्षलवादी पळून गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे या नक्षलवाद्यांचा शोध सध्या घेतला जात आहे. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरून तीन एके 47, दोन आयएनएसएएस, एक कार्बाइन आणि एक एसेलआर अशी एकूण 7 स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली आहे.
https://x.com/CMOMaharashtra/status/1813651774148079763?s=19
मुख्यमंत्र्यांनी केले पोलिसांचे कौतुक
दरम्यान, या कारवाईबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली पोलिसांचे विशेष अभिनंदन केले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक, नक्षल विरोधी मोहिमेचे पोलीस महानिरीक्षक पोलीस अधीक्षक आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांनी या मोहिमेत सहभागी झालेल्या पोलिसांच्या शौर्याचे कौतुक केले. ही कारवाई गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी हालचालींवर निर्णायक आघात ठरणारी असून विकासाला प्राधान्य देऊन हिंसाचाराला ठाम विरोध करणे, असे आमचे धोरण असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. गडचिरोली जिल्हा संपूर्णपणे नक्षलमुक्त करण्याचा आमचा निर्धार आहे. पोलीस दलाच्या या अतुलनीय कामगिरीमुळे परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम होणार असून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.