50 फूट खोल दरीत बस कोसळून 12 कर्मचाऱ्यांचा मृत्यू! कंपनीकडून कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत जाहीर

रायपूर, 10 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) छत्तीसगडमधील रायपूर येथे केडिया डिस्टिलरी कंपनीच्या 40 कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळल्याने 12 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. छत्तीसगडमधील रायपूर-दुर्ग रोडवर काल रात्री हा अपघात झाला. रायपूर-दुर्ग रस्त्यावर प्रवाशांनी भरलेली बस 50 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातावेळी बसमध्ये एकूण 40 कर्मचारी प्रवास करत होते. हे सर्वजण केडिया डिस्टिलरी कंपनीचे कर्मचारी आहेत. फॅक्टरीतून घरी जात असताना या बसचा अपघात झाला. दुर्दैवाने यांमधील 12 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 3 महिलांचा समावेश आहे.

रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू

या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी बचावकार्य सुरू केले. रात्री उशिरापर्यंत हे बचावकार्य सुरू होते. रात्रीच्या अंधारात पुरेशी प्रकाश व्यवस्था नसल्यामुळे मोबाईल आणि टॉर्चच्या सहाय्याने बचावकार्य करण्यात आले. यावेळी जखमींना बसमधून बाहेर काढण्यात आले. या अपघातात 10 जण जखमी झाले आहेत. त्यांना रायपूर येथील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

जखमींचा खर्च कंपनी उचलणार

दरम्यान, या घटनेनंतर कंपनीतील संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. तर केडिया डिस्टिलरी कंपनीने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. सोबतच कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याचे आश्वासन कंपनीने दिले आहे. याशिवाय जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च देखील कंपनी उचलणार आहे. या अपघातात जखमी झालेल्या 10 जणांना रायपूर एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. यामध्ये 6 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे. तर या 10 जखमींपैकी एका रुग्णाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. मात्र, एका रुग्णाची प्रकृती सध्या गंभीर असल्याचे रायपूर एम्सच्या डॉक्टरांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *