राम मंदिराच्या उभारणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून 11 कोटींची देणगी

अयोध्या, 07 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येतील प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या सोहळ्याची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. या सोहळ्यासाठी साधू-मुनींसह व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपी पाहुण्यांना प्रशासनाकडून आमंत्रणे पाठवली जात आहेत. या दिवशी राम मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाच्या वतीने या राम मंदिराच्या उभारणीसाठी 11 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.

https://x.com/ANI/status/1743619068819583405?s=20



यावेळी एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या 11 कोटी रुपयांचा धनादेश श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव चंपतराय यांच्याकडे सुपूर्द केला आहे. यावेळी शिवसेनेचे राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश म्हस्के, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी आणि राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे पदाधिकारी उपस्थित होते. याची माहिती श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.

https://twitter.com/DrSEShinde/status/1743668330517659944?s=19

राम मंदिराचे स्वप्न पूर्ण झाले: श्रीकांत शिंदे

श्रीराम मंदिराचे स्वप्न अनेक पिढ्यांनी पाहिले. हे स्वप्न आता पूर्ण होत असून हा प्रत्येक भारतीयांसाठी आनंदाचा, अभिमानाचा आणि उत्साहाचा क्षण आहे. आताच्या पिढीला आणि भविष्यातल्या अनेक पिढ्यांना प्रभू श्रीरामाचे दर्शन अयोध्येतील या मंदिरात करता येणार असल्याचे श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले. तसेच श्रीकांत शिंदे यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. “आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या पुढाकाराने आज गेल्या अनेक दशकांपासून ज्याची सर्व भारतवासी आतुरतेने वाट पाहात होते, तो क्षण, अर्थातच अयोध्या येथे प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर उभे राहत आहे. या मंदिर उभारणीच्या संघर्षात आजवर अनेक कारसेवकांचे, शिवसैनिकांचे आणि श्री रामभक्तांचे योगदान लाभले आहे. वंदनीय हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न आज प्रत्यक्षात येत आहे.” असे ते यामध्ये म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *