मुंबई, 22 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला 21 फेब्रुवारीपासून सुरूवात झाली आहे. या परीक्षेच्या पहिल्या दिवशी घेण्यात आलेल्या दहावीच्या मराठी विषयाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याच्या अफवा काही भागांमध्ये पसरवल्या गेल्या होत्या. यासंदर्भात शिक्षण मंडळाने स्पष्टीकरण दिले आहे. शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांना अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, परीक्षेसंदर्भातील कुठल्याही शंका असल्यास विद्यार्थ्यांनी शाळा, परीक्षा केंद्र किंवा शिक्षण मंडळाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
शिक्षण मंडळाकडून काय सांगण्यात आले?
दरम्यान, जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल या परीक्षा केंद्रावर मराठीचा पेपर फुटल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रसारित झाल्या होत्या. माध्यमांमध्ये प्रसारित झालेली दोन पाने मूळ प्रश्नपत्रिकेची नसून खासगी प्रकाशकाने छापलेल्या पुस्तकातील होती. काही हस्तलिखित नोट्समध्ये प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न आणि उत्तरे आढळली असली तरी हा पेपर फुटीचा प्रकार नसून गैरमार्गाने विद्यार्थ्यांना मदत करण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून आले. या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना शिक्षण मंडळाने दिल्या आहेत.
तसेच जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होण्यापूर्वी पालकांनी गर्दी केली होती, मात्र पोलिसांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले. परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडलेला नसल्याचे स्पष्टीकरण शिक्षण मंडळाने दिले आहे. यासोबतच यवतमाळ जिल्ह्यातील महागाव व कोठारी परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका मोबाईलवर व्हायरल झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. नंतर केलेल्या तपासात पेपर फुटल्याचे सिद्ध झाले नाही, त्यामुळे संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले आहे.