ठाणे, 31 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) नववर्षाच्या एक दिवस आधी ठाणे पोलिसांनी एका रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला आहे. यावेळी पोलिसांनी याठिकाणी पार्टी करित असलेल्या 100 मुला-मुलींना ताब्यात घेतले आहे. मुंबईला लागून असलेल्या ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वडवली बीचजवळ ही रेव्ह पार्टी आयोजित करण्यात आली होती. एका खासगी प्लॉटमध्ये पार्टी सुरू होती. यासंदर्भातील माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती.
https://twitter.com/ANI/status/1741368878222147848?s=19
या माहितीच्या आधारे पोलिसांनी आज मध्यरात्रीच्या सुमारास या रेव्ह पार्टीवर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दारू आणि अमली पदार्थ जप्त केले. सोबतच त्यांच्या गाड्या देखील जप्त केल्या आहेत. दरम्यान, या रेव्ह पार्टीमध्ये मोठ्या आवाजात नाच गाणे होते. पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला त्यावेळेस बहुतांश मुले-मुली दारूच्या आणि ड्रग्सच्या नशेत नाचताना आढळून आली होती. यावेळी पोलिसांनी 100 जणांना अटक केली आहे. त्यांची सध्या वैद्यकीय चाचणी करण्यात येत आहे.
या रेव्ह पार्टीचे निमंत्रण सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. तसेच यामध्ये पार्टीचे ठिकाण देखील शेयर करण्यात आले होते. सध्या या घटनेचा पोलीस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, नववर्षाच्या पूर्वसंध्येला ठाण्यात रेव्ह पार्टीची घटना उघडकीस आल्यानंतर राज्यभरातील पोलीस सतर्क झाले आहे. रेव्ह पार्टी सारख्या घटना घडू नयेत, यासाठी राज्यातील मुंबई आणि पुण्यासारख्या अनेक मोठ्या शहरांत पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.