मुंबई विमानतळावर 10 किलो सोने जप्त, चौघांना अटक

मुंबई, 02 जून: (विश्वजीत खाटमोडे) मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या पथकाने जवळपास 10 किलो सोने आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या आहेत. याप्रकरणी मुंबईच्या सीमाशुल्क विभागाने चार प्रवाशांना अटक केली आहे. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या महिन्यात 4 दिवसांच्या छाप्यात सीमाशुल्क विभागाने सुमारे 6 कोटी 75 लाख रुपये किमतीचे 9.76 किलो वजनाचे सोने आणि सूक्ष्म इलेक्ट्रनिक्स वस्तू जप्त केल्या आहेत. तसेच या कारवाईमध्ये 88 लाख रुपयांचे परकीय चलन देखील जप्त करण्यात आले आहे.

https://twitter.com/mumbaicus3/status/1796770890581205478?s=19

20 प्रकरणांत 4 जणांना अटक

दि. 27 ते 30 मे या कालावधीतील 20 प्रकरणांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणात सीमाशुल्क विभागाने 4 जणांना अटक केली आहे. सोन्याच्या तस्करीप्रकरणी या चारही आरोपींची सध्या चौकशी करण्यात येत आहे. यासंदर्भातील माहिती मुंबई सीमाशुल्क विभागाने दिली आहे. दरम्यान या आरोपींनी हे सोने लपवून आणले असल्याचे मुंबई सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यावेळी सीमा शुल्क विभागाने या आरोपींकडून सोन्याचे दागिने, रोडियम प्लेटेड सोन्याची साखळी आणि बटण, काही सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक वस्तू यांच्यासह दोन प्लास्टिक शॅम्पूच्या बाटल्यांमध्ये लपविलेले परकीय चलन जप्त केले आहे.

सीमाशुल्क विभागाची करडी नजर

दरम्यान, सोने, परकीय चलन आणि सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या तस्करीसाठी सध्या तस्कर नवनवीन पद्धती वापरत असल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु असे लोक सीमाशुल्क विभागाच्या नजरेतून सुटू शकत नाहीत. तस्करांनी विविध पद्धती अवलंबल्या असल्या तरीही तस्करी केलेले सोने आणि इतर वस्तुंसहित असे गुन्हेगार अनेकदा विमानतळावर पकडले गेले आहेत. कारण, विमानतळावर परदेशातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर सीमा शुल्क विभागाची करडी नजर असते. त्यांच्या नजरेतून असे आरोपी सहजासहजी सुटू शकत नाहीत. अशा घटनांमध्ये यापूर्वी अनेकांना अटक झाली आहे. तरी देखील अशा घटना सध्या घडत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *