मुंबई, 28 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या काळात गैरप्रकार रोखण्यासाठी राज्यभरात विविध पथके तैनात केली आहेत. तसेच राज्यात सध्या अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. यादरम्यान पोलिसांनी मुंबईत 1 कोटी 32 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
https://x.com/ANI/status/1850873442314457418?t=yX0nP57Jtp2ssKQHTtklHw&s=19
यावेळी मुंबईतील व्हीपी मार्ग पोलीस ठाण्यात एफएसटी पथकाकडून ताब्यात घेण्यात आलेल्या या 5 संशयितांची चौकशी करण्यात आली. दरम्यान, या रकमेची माहिती पोलिसांनी आयकर विभागाला दिली आहे. ही रोकड कोणाची आहे? ही रोकड कुठून आली? आणि त्याचा उद्देश काय होता? हे जाणून घेण्यासाठी सध्या पोलीस पाचही जणांची चौकशी करीत आहेत. तसेच या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस आणि आयकर विभागाकडून केला जात आहे.
यापूर्वीही जप्तीची कारवाई झाली होती
यापूर्वी, पुण्यातील खेड शिवापूर टोल नाक्याजवळ एका कारमधून 5 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. नाकाबंदीदरम्यान राजगड पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले होते. तसेच पोलिसांनी त्यांची कार जप्त केली होती. त्यानंतर पुण्यातील हडपसर परिसरात एका व्यावसायिकाकडे 22 लाखांहून अधिक रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. त्यानंतर पुणे शहरात एका वाहनातून 138 कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले होते. या मुद्देमालाची देखील आयकर विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे.