सोलापूर, 13 एप्रिलः सोलापूर शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची मिरवणूक ही सर्वात मोठी मिरवणूक म्हणून सर्वज्ञात आहे. या मिरवणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने सहभागी होत असते. मात्र कोरोना काळात या मिरवणुकीला खंड पडला. आता तब्बल दोन वर्षांनंतर सोलापुरात पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्याची, असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे आंबेडकरी जनतेत मोठा उत्साह निर्माण झाला आहे. मात्र सोलापुरात एका कारणामुळे आंबेडकरी पदाधिकारी आणि पोलीस प्रशासन आमने-सामने आले आहेत.
सोलापूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने मोठ मोठे साऊंड लावण्यावरून पोलीस प्रशासन व आंबेडकर चळवळीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान, मंगळवारी पोलीस आयुक्त हरीश बेजर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव व विश्वस्त समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये मोठ मोठे साऊंड लावण्याच्या मुद्द्यावरून पोलिस प्रशासन व आंबेडकरी अनुयायांमध्ये वाद झाला होता.
याचे पडसाद आज, बुधवारी 13 एप्रिल सकाळी सोलापूर जिल्हाधिरी कार्यालया समोरील पुनम गेट येथे आंबेडकरी चळवळीतील विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासना विरोधात धरणे आंदोलन केले. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मिरवणुकीत मोठ मोठे साऊंड लावण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. मात्र त्यासाठी पोलीस प्रशासनाने नकार दिला आहे. यातूनच हा वाद अजून चिघळताना दिसत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंबेडकरी अनुयायींनी रास्ता रोको केला. त्यामुळे शहरातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. आंबेडकरी अनुयायींची पोलिस प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंबेडकरी अनुयायींना पोलिसांनी ताब्यात घेत पुन्हा सोडून दिले आहे. जर मागण्या मान्य झाल्या नाही, तर आंदोलन अजून तीव्र करण्याचा पदाधिकारी व कार्यकर्तेकडून इशारा देण्यात आला.