शरद पवारांच्या घरावर दगडफेक!

मुंबई, 8 एप्रिलः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील घराबाहेर संपकरी एसटी कर्मचारी आक्रमक झाले. दरम्यान, शरद पवार यांचं सिल्वर ओक घराबाहेर कर्मचाऱ्यांनी अचानकपणे आंदोलन केले आहे. या आंदोलनादरम्यान, कर्मचाऱ्यांनी घराच्या आवारात घुसखोरी केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी घराच्या आवारात घुसून चप्पल आणि दगड फेक सुद्धा केली.

एसटी महामंडळाचे विलीनीकरण पूर्णपणे करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या एक गटाने आक्रमक भूमिका घेतल्याची बाब समोर आली आहे. या आंदोलकांनी आक्रमक होत सरळ शरद पवारांचं मुंबई येथील सिल्वर ओक निवासस्थान गाठले. या निवासस्थानाच्या आवारात घुसून आंदोलक कर्मचाऱ्यांनी चप्पल फेकीसह दगडफेकही केली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून घडलेल्या प्रकाराचा विविध नेत्यांकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या प्रकरणात जे दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांना सांगितले.

दरम्यान, एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर ठाम असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा हायकोर्टाने बजावले आहे. 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याची सूचनाही हायकोर्टाने दिली आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना कामावर परत घेण्याची ग्वाही कोर्टात दिली आहे. त्यानंतर कोर्टाने 22 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर पुन्हा एकदा हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडली. यावेळी एसटी कामगारांच्या संपाविरोधात एसटी महामंडळाचा अवमान याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *