नागपूर, 11 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज कलम 370 संदर्भातील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे हे विधान परिषदेच्या कामकाजाला हजर राहिले. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.
https://twitter.com/OfficeofUT/status/1734115355621224837?s=19
“2019 ला 370 कलम हटवण्याच्या निर्णयाला आम्ही पाठींबा दिला होता, तो निर्णय सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवला, त्याचं मी स्वागत करतो. सर्वोच्च न्यायालयानं सप्टेंबरपर्यंत निवडणूका घ्यायला सांगितल्यात. त्या निवडणूका घेण्यापूर्वी जर का पाकव्याप्त काश्मिर घेऊ शकलो, तर संपूर्ण काश्मिरमध्ये एकत्र निवडणूका झाल्यास देशवासियांना आनंद होईल,” असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
“परिस्थितीमुळे घर सोडून गेलेले काश्मिरी पंडीत निवडणूकांपूर्वी पुन्हा सगळेच्या सगळे काश्मिरमध्ये परत येतील ह्याची गॅरंटी कोण देईल? पंतप्रधान ह्याची गॅरंटी देतील? काश्मिरी पंडीतांना एकमेव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांनी महाराष्ट्रात आसरा दिला होता. ते निवडणुकीपूर्वी घरी परततील आणि खुल्या वातावरणात ते मतदान करू शकतील का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.
https://twitter.com/OfficeofUT/status/1734155675113288146?s=19
यावेळी उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राज्य सरकारवर निशाणा साधला. “शेतकऱ्यांवर एक दीड वर्षात जी काही संकट कोसळत आहेत, नुकतीच ही गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला त्याच्याबाबतीत सरकारनं काय केलं आहे? विमा कंपन्या यांनी दरवाजे खिडक्या बंद केल्या आहेत. या सरकारने जाहीर केलं होतं की दिवाळीपर्यंत विम्याची अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना देऊ, ती किती लोकांना किती शेतकऱ्यांना मिळाली आहे? याचाही काही अंदाज नाही. असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास विरोध दर्शवला होता. यासंदर्भात फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिले होते. हे पत्र त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. या पत्रावरून उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. पत्र लिहिल्यानंतर मला वाटले नवाब मलिक हे सभागृहात लांब बसले असतील, पण तसे काही झाले नाही. याउलट नवाब मलिक हे त्यांच्या शेजारीच बसले आहेत. अशा शब्दांत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.
https://twitter.com/OfficeofUT/status/1734141376395419667?s=19
तसेच ज्या न्यायाने नबाब मलिकांना तुम्ही दूर ठेवा असे सागितलं मग तोच न्याय दुसऱ्याला लावणार आहात की नाही? नबाब मलिकांना जो न्याय लावला तोच प्रफुल्ल पटेलांना लावून त्यांच्यापासून तुम्ही अंतर ठेवणार आहेत की नाही? या पत्राचे उत्तर देवेंद्र फडणवीस हे कधी देणार? याची देखील वाट पाहात असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
https://twitter.com/OfficeofUT/status/1734141420284637417?s=19
याशिवाय उद्धव ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. लोकांच्या घरादारावर आणि समुद्रावर नांगर चालवणारा मुख्यमंत्री मी पहिल्यांदाच पाहिला, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. तसेच शेतकऱ्यांच्या विम्याकरिता जे 8 हजार कोटी जो राज्य सरकारने भरलाय, हा जनतेचा पैसा आहे. त्याच पुढे काय झालं? हा पैसे देखील त्यांच्या मित्रांच्या खिशात गेला का, ह्याचे उत्तर ही त्यांनी द्यायला हवे. असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी उद्धव ठाकरेंनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले. सर्व समाजांना ज्यांना आवश्यकता असेल त्यांना आरक्षण द्या. पण दुसऱ्या कोणाचं आरक्षण कमी न करता आरक्षण द्यावं, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.