रिषभ पंत यंदाच्या आयपीएल स्पर्धेत खेळणार?

दिल्ली, 11 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारताचा युवा क्रिकेटपटू रिषभ पंतच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रिषभ पंत 2024 च्या आयपीएल स्पर्धेत खेळू शकतो, अशी बातमी आता समोर आली आहे. यासंदर्भातील वृत्त क्रिकबझने दिले आहे. 2024 च्या आयपीएलमध्ये रिषभ पंत हा दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार असेल, असे या वृत्तात म्हटले आहे. त्यामुळे रिषभ पंतचे चाहते या बातमीमुळे उत्साहित झाले आहेत. मात्र, यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.



दरम्यान, गेल्या वर्षी डिसेंबर महिन्याच्या शेवटी रिषभ पंतचा कार अपघात झाला होता. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. तेंव्हापासून रिषभ पंत हा क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. त्यामुळे तो आता भारतीय क्रिकेट संघाचा भाग नाही. मात्र, रिषभ पंत आता तदुरुस्तीसाठी कठोर परिश्रम करीत आहे. तसेच तो फिटनेस परत मिळवण्याच्या मार्गावर आहे. अलीकडेच त्याने कोलकाता येथे दिल्ली कॅपिटल्सने आयोजित केलेल्या शिबिरातही भाग घेतला होता.

तत्पूर्वी, गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये प्रथमच इम्पॅक्ट प्लेयरचा नियम लागू करण्यात आला होता. या नियमानुसार, जर एखादा खेळाडू एखाद्या संघात अंतिम अकराचा भाग असेल आणि तो फलंदाजी करत असेल, तर दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षण करताना त्या खेळाडूच्या जागी इतर कोणत्याही खेळाडू म्हणजेच संघाबाहेर असणारा खेळाडू क्षेत्ररक्षण करू शकतो. याच नियमाच्या आधारे, आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्स रिषभ पंतचा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून वापर करण्याची शक्यता आहे. त्यानुसार रिषभ पंत आपल्याला केवळ फलंदाजी करताना दिसेल आणि क्षेत्ररक्षणावेळी त्याच्याजागी दुसराच कोणीतरी खेळाडू क्षेत्ररक्षण करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *