बारामती, 22 मार्चः बारामती शहरासह राज्यभरात सोमवार, 21 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती साजरी करण्यात आली. राज्य शासनाने दिलेल्या कोरोनाच्या नियमानुसार मिरवणुक आणि बाईक रॅली न काढता शहरातून मोठ्या उत्साहात सर्व जाती-धर्मातील मावळ्यांनी शिवजयंती साजरी केली.
शिवजयंतीनिमित्त शहरातील विविध भागात विविध उपक्रम राबविण्यात आले. तसेच शहरातील चौका चौकात शिवप्रेमींनी वेगवेगळे पद्धतीने मर्दानी खेळ दाखविले. यासह पारंपारीक पद्धतीचे वाद्य, विविध रोषणाई आणि तुरळक ठिकाणी डिजे साऊंड लावून नागरीकांनी जयंतीचा आनंद लुटला.
शहरात शिवजयंतीचा रंग ओसरत गेला, तसा बारामती नगर परिषदेचे रंग चढत गेला. जयंतीचा समारोप झाल्यानंतर लगेच नगर परिषदेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी कामाला लागले. परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी हात झाडू घेत शहरातील विविध ठिकाणी रात्री उशिरापर्यंत स्वच्छता मोहीम राबवित एकप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादनच केले. या कामगिरीने बारामती नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.