मोहोळ, 5 एप्रिलः मोहोळ- पंढरपूर मार्गावर सोमवारी दुपारी 3 च्या सुमारास भरधाव कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. हा अपघात मोहोळच्या पुढे सारोळे पाटी नजीक झाला. या अपघातात सख्खे भावांचा जागीच मृत्यू झाला तर चारजण जखमी झाले आहेत. मृत भावांमध्ये एकजण सोलापूर ग्रामीण पोलीस दलात पोलीस म्हणून कार्यरत होता.
दरम्यान, मोहोळहून पंढरपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर सारोळे पाटीजवळ रस्त्याच्या कडेला ट्रक थांबला होता. या थांबलेल्या ट्रकला भरधाव वेगात ओमनी कारने जोराची धडक दिली. या धडकेत दयानंद अण्णाराव बेलाळे (वय 30) आणि सचिन अण्णाराव बेलाळे (वय 32) यांचा जागीच मृत्यू झाला. मृत दोघे रा. रोखडा-सावरगाव ता. अहमदपूर जिल्हा लातूर येथील मूळ रहिवाशी आहेत.
बेलाळे हे पंढरपूरला पांडुरंगाचे दर्शन घेऊन आपल्या कुटुंबासह घराकडे परत निघाले होते. त्यावेळी पंढरपूरहून मोहोळकडे निघालेल्या एम एच 12 एफ झेड 7377 या ट्रकचालकाने सारोळे पाटी जवळील सह्याद्री ढाब्या समोर ट्रक धोकादायक स्थितीत उभा करून धाब्यावर जेवण घेण्यासाठी गेला होता. यावेळी कुटुंबासह निघालेले कॉन्स्टेबल दयानंद बेलाळे, त्यांचा भाऊ सचिन बेलाळे यासह त्यांची पत्नी स्वाती सचिन बेलाळे (वय 22) आणि दिपाली दयानंद बेलाळे (वय 25) व त्यांची दोन लहान मुले त्रिशा (वय 8) वर्ष व श्लोक (वय 1) वर्ष हे सर्वजण ओमनी कार क्रमांक एम एच 12 एन ई 4487 या कारने थांबलेल्या ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली. यात दयानंद व त्याचा भाऊ सचिन या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातामध्ये दोघांच्या पत्नी स्वाती व दीपाली व मुले त्रिशा व श्लोक हे सर्वजण गंभीर जखमी झाले. यांना खाजगी वाहनातून सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. या अपघाताचा गुन्हा मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये उशिरापर्यंत दाखल केला नव्हता. मात्र, कॉन्स्टेबल दयानंद यांच्या मृत्यूने मोहोळ पोलीस ठाणे व सोलापुर मुख्यालय यामध्ये मोठी हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी पळून जाणाऱ्या ट्रकचालकास ताब्यात घेतले आहे.