बारामती, 11 एप्रिलः आई-वडिल इतर मुलांशी बोलतात म्हणून आणि घरी उशीरा येतात म्हणून रागवतात. याकारणाने इयत्ता आठवी आणि दहावीत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींनी घर सोडून निघून जाण्याचा निर्णय घेत एका मंदिरात रात्रभर राहिल्या. त्यानंतर या मुली माळेगावमधील एका शेतकऱ्याच्या उसामध्ये लपलेल्या आढळल्या. त्यामुळे त्यांना पोलीस स्टेशनला आणले. तपासात त्या याआधीही घर सोडून गेल्याची माहिती समोर आली. यामुळे पोलिस स्टेशनला त्या मुलींच्या आई-वडिलांना बोलवले. मात्र त्या मुलींनी आई-वडिलांसोबत जाण्यास आणि सोबत राहण्यास नकार दिला.
सदर प्रकरणात पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलींच्या वारंवार घर सोडून गेल्याने भविष्यात मोठा धोका उद्भवू शकतो, या कारणामुळे त्यांना बाल कल्याण समितीशी पत्र व्यवहार करून त्या अल्पवयीन मुलींना बाल सुधारगृहात ठेवण्याचा निर्णय घेतला. यातून त्यांना प्रेरणा सुधारगृहात दाखल केल्याची माहिती बारामती शहर पोलीस स्टेशनच्या वतीने देण्यात आली. यासह बारामती शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात तीन लहान भावंडे काही दिवसांपासून भिक मागत असल्याचे आढळले. त्या मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र त्यांना पुन्हा त्यांच्या आई- वडिलांकडे देणे हे त्यांच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याने त्यांनासुद्धा बाल कल्याण समितीच्या आदेशावरून ससून रुग्णालय येथील सोफिया बाल सुधारगृहात दाखल केले. तसेच बारामती शहरातील बस स्टँड परिसरात वाम मार्गाला लागलेला चार वर्षीय तामिळ मुलाला ताब्यात घेतले. तसेच त्याला सोफिया बाल सुधारगृहात दाखल केले.
बारामती शहरात घर सोडणाऱ्या, भीक मागणाऱ्या, पर राज्यातील, वाम मार्गाला गेलेल्या अल्पवयीन मुला मुलींना शहर पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची बाल सुधारगृहात रवानगी केली. या कामगिरीमुळे बारामती शहर पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या सदर कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार जगताप, पोलीस नाईक कोळेकर यासह पोलीस शिपाई देवकर, महिला पोलीस शिपाई गोरड, पोलीस शिपाई गोरे यांनी काम पाहिले.