बारामती, 8 एप्रिलः बारामती शहर हे झपाट्याने विकसित होत आहे. बारामती शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी विविध विकास कामे सुरु आहेत. या विकास कामांमुळे बारामतीच्या वैभवात आणखीन भर पडत आहे. मात्र या विकासाच्या वैभवाला गालबोट लागल्याचे प्रकार काही ठिकाणी दिसत आहे.
बारामती शहरातून वाहणाऱ्या कऱ्हा नदीच्या पात्रामध्ये गाबियन वॉलच्या सुशोभीकरणाचे काम चालू आहे. सदर काम हे वैशिष्ट पूर्ण योजनेतून काम चालू आहे. यामुळे बारामती नगर परिषदच्या वैभवात भर टाकली आहे. तसेच सदर काम हे महाराष्ट्रातील पहिले नदी पात्रातील काम आहे.
मात्र सदर कामात बालमजुरांचा सर्रास वापर होत आहे. तसेच ठेकेदार हे या कामगारांची पिळवणूक केल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे सदर कामाच्या दर्जाबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी गायकवाड आणि पवार यांचे या कामाकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. बारामती परिसरातील पाणी पातळी वाढेल, या हेतून सदर कामात पाण्यासारखा पैसा खर्च करून सुशोभीकरण करण्यात येत आहे. टक्केवारीच्या नादात सदर काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे केल्याचे जाणकार सांगत आहे. सदर कामावर बालमजुरांची संख्या लक्षणीय आहे. यामुळे सदर कामाच्या ठेकेदाराविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जनसमन्यातून होत आहे.