बारामती, 9 एप्रिलः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक निवास स्थानावर संतप्त एसटी कर्मचाऱ्यांकडून शुक्रवार, 8 एप्रिल 2022 रोजी चप्पल, दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर गृहमंत्र्यांकडून पवारांच्या घरासमोर पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे.
बारामती शहरातील भिगवण रोडवरील सहयोग सोसायटी येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर, बारामती माळेगाव रोडवरील शरद पवार यांच्या गोविंद बाग समोर, बारामती इंदापूर रोडवरील काटेवाडी येथील पवारांच्या घरासमोर काल रात्रीपासूनच पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे.
दरम्यान, बारामती शहर आणि तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत आज, शनिवार 9 एप्रिल 2022 रोजी शहर पोलीस स्टेशन शेजारी मारूती मंदीर येथे निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. या निषेध सभेत शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवास स्थानावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केला.