ठाणे, 18 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) काही दिवसांपूर्वी ठाण्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मुलाने आपल्या प्रेयसीच्या अंगावर कार चालवून तिला जखमी केले होते. याप्रकरणी ठाणे पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. अश्वजित गायकवाड असे या प्रमुख आरोपीचे नाव असून तो महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा मुलगा आहे. त्याने रोमिल पाटील आणि सागर शेडगे नावाच्या मित्रांच्या मदतीने या तरूणीवर हा हल्ला केला होता. यासंदर्भात प्रिया सिंग नावाच्या तरूणीने पोलिसांत तक्रार केली होती. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
https://twitter.com/ANI/status/1736423275746791744?s=19
दरम्यान, ही घटना ठाणे जिल्ह्यातील घोडबंदर रोडवरील ओवळा भागातील एका हॉटेल परिसरात 11 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली होती. मात्र तक्रार दाखल करून देखील आरोपींविरोधात कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळे, या घटनेची माहिती प्रिया सिंगने इंस्टाग्रामवर एक पोस्ट करून दिली होती. तिची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर यासंदर्भात समाजमाध्यमातून प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात होती. या पार्श्वभूमीवर, राज्य महिला आयोगाने ठाण्याचे जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांच्याकडून तातडीने अहवाल मागवला होता.
https://twitter.com/ChakankarSpeaks/status/1735710432684601602?s=19
https://twitter.com/ANI/status/1736333752928972900?s=19
https://twitter.com/ANI/status/1736271847380172893?s=19
तपासासाठी एसआयटी स्थापन
त्यानंतर काल या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी, डीसीपी झोन 5 अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली एक एसआयटी स्थापन करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. ज्यात अश्वजित अनिल गायकवाड आणि त्याच्या 2 मित्रांना आरोपी म्हणून नाव देण्यात आले आहे. याप्रकरणी सर्व बाजूंनी विचार केला जात आहे. साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात आहेत आणि फॉरेन्सिक पुरावे गोळा केले जात आहे, अशी माहिती ठाणे सह पोलीस आयुक्त जय जीत सिंग यांनी दिली होती.
हा तपास करीत असताना काल रात्री ठाणे पोलिसांच्या एसआयटीने मुख्य आरोपी अश्वजित गायकवाड आणि त्याचे दोन साथीदार रोमिल पाटील आणि सागर शेडगे यांना अटक केली. यासोबतच त्यांनी या गुन्ह्यात वापरलेली कार पोलिसांनी जप्त केले आहे. या आरोपींच्या विरोधात कलम 279, 338, 323, 504, 34 IPC अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
https://twitter.com/ANI/status/1736455465004150925?s=19
https://www.instagram.com/p/C01Dj5fJXtR/?igshid=MzRlODBiNWFlZA==
प्रियाने इंस्टाग्रामवर केली होती पोस्ट!
तत्पूर्वी, अश्वजित आणि प्रिया हे दोघे गेल्या साडेचार वर्षांपासून एकमेकांना डेट करीत होते. मात्र अश्वजितने त्याचे लग्न झाले असल्याचे आपल्यापासून लपवले असल्याची माहिती प्रिया सिंगने सोशल मीडियावरून दिली होती. त्याचे लग्न झाले असल्याचा जाब विचारण्यासाठी गेल्यावर त्याने मला मारहाण केली. तसेच अश्वजित आणि त्याच्या मित्रांनी मला शिवीगाळ केली. त्यानंतर अश्वजितने त्याच्या ड्रायव्हरला मला कारने चिरडण्यास सांगितले होते. त्याच्या सांगण्यावरूनच चालकाने वेग वाढवला आणि माझ्या अंगावर कार चालवून मला जखमी केले. असा आरोप प्रिया सिंगने केला आहे.
या घटनेत प्रिया सिंग गंभीर जखमी झाली असून तिचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला आहे. त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तसेच तिच्या संपूर्ण शरीरावर जखमेच्या खुणा आहेत. माझ्या हातावर, पाठीवर आणि पोटावर खोल जखमा आहेत. मला किमान तीन-चार महिने अंथरुणावर राहावे लागेल. माझ्या कमाईवर माझे कुटुंब चालत होते. मी यापुढे काम करू शकणार नाही. असे प्रिया सिंगने म्हटले आहे.
तसेच याप्रकरणी एफआयआर दाखल केल्यामुळे ते माझ्या बहिणीला धमकावत आहेत. असा आरोप प्रिया सिंगने केला आहे. त्यामुळे मला भीती वाटते. मला आणि माझ्या कुटुंबाला धोका असल्याचे देखील तिने म्हटले आहे. दरम्यान, अश्वजितच्या कुटुंबीयांनी प्रिया सिंगने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच प्रिया आणि माझ्यात फक्त मैत्री होती, असे अश्वजितने म्हटले आहे.