पुणे, 3 मार्चः पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात चंदन तस्करी उघडकीस आली आहे. हा चंदन तस्कर पुष्पा चित्रपटातील पुष्पाराजच्याही दोन पाऊले पुढचा निघाला आहे. भोर तालुक्यातील नसरापूर गावातील बनेश्वर वनउद्यानाच्या मागील शिवगंगा नदीतील डोहात चंदनाची लाकडे लपवून ठेवली होती. पुणे येथून फिरायला आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या करडी नजरेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. सध्या या प्रकारामुळे जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु आहे.
पुण्यातील दत्तवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी सद्दाम शब्बीर शेख हे त्यांच्या कुटुंबियांसह बनेश्वर वनउद्यानात फिरायला गेले होते. दुपारच्या वेळी ते उद्यानामागील नदीच्या डोहात पोहण्यासाठी उतरले असता त्यांना पाण्याच्या तळाशी लाकडी ओंडके जाणवले. त्याची पाहणी करण्यासाठी ते बाहेर काढले असता ते चंदनच निघाले. त्यानंतर त्यांना चंदनाची आणखीन 10 ते 15 चंदनाची लाकडे आढळून आली. या बाबतची माहिती सद्दाम शेख यांनी नसरापूर पोलीस ठाण्यात दिली. माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय सुतनासे, हवालदार संजय ढावरे यांनी सदर ठिकाणी जाऊन माहिती घेत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावले. वनविभागाचे वनरक्षक बी एस तांबे, अशोक तांबे, संध्या कांबळे यांनी घटनास्थळी येऊन माळेगावचे सरपंच अमोल मोरे व रामदास राजपुरे यांच्या समक्ष पंचनामा करुन पाण्यातुन बाहेर काढलेले किंमती असलेले चंदनाचे ओंडके ताब्यात घेतले आहेत.
दरम्यान, बनेश्वर वनउद्यानासह परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातून मागील अनेक महिन्यापासुन रात्रीच्या वेळी चंदनाच्या झाडांची चोरी होत आहे. अद्याप ते चंदन चोर सापडलेले नाहीत. चंदन चोराला लाकडांची एकदम वाहतुक करणे शक्य न झाल्याने नदीच्या पाण्यात ओंडके लपवल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणातील चोर सदर भागाची माहीती असलेले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नसरापूर परिसरातील हा ‘पुष्पा’ कोण, याची चर्चा सध्या सुरु आहे.
कार्यतत्पर पोलिस कर्मचारी सद्दाम शेख यांच्या सतर्क नजरेमुळे हा प्रकार उघडकीस आल्याने नसरापूर वन विभाग, नसरापूर पोलीस ठाणे आणि पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा बनेश्वर वनउद्यान कार्यालया जवळ सत्कार करण्यात आला.