बारामती, 29 मार्चः गोळीबार प्रकरणात माजी सरपंच जयदीप तावरे यांना मोक न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. ‘मोका’ न्यायालयाचे न्या. जी. पी. आगरवाल यांनी जयदीप तावरे यांच्या जामीन अर्जावर काल सोमवारी, 28 मार्च रोजी उशिरा मंजुर करत स्वाक्षरी केली आहे. हा जामीन मंजुर करताना तपास कामी पोलिसांना सहकार्य करणे यासह अनेक अटींच्या आधारे जामीन अर्ज मंजूर झाला आहे.
दरम्यान, 31 मे 2021 रोजी बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथील रविराज तावरे यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या जीवघेण्या हल्ल्या प्रकरणी जयदीप तावरे यांना अटक करण्यात आली होती.
रविराज तावरे गोळीबार प्रकरणात जयदीप तावरे यांचा सहभाग नाही, असा तत्कालीन तपासाधिकारी नारायण शिरगावकर यांनी 21 जुलै 2021 रोजी दिलेला अहवाल मुंबई उच्च न्यायालनाने फेटाळला होता. तसेच या प्रकरणात उच्च न्यायालयाचा निर्णय पुण्याच्या मोका न्यायालयाने कायम ठेवला. या निर्णयाविरोधात जयदीप तावरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र तेथेही जयदीप तावरेंना दिलासा मिळाला नाही. यामुळे जयदीप तावरे यांना अटक करण्यात आली होती.
मात्र मोका न्यायालयान त्यांना जामीन दिल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. जयदीप तावरे यांच्या वतीने अॅड. सचिन वाघ, अॅड. नामदेव पाटील, अॅड. ओंकार टोळे यांनी न्यायालयात बाजू मांडण्याचे काम केले आहे.
रविराज तावरे गोळीबार प्रकरणात माळेगावमधील संशयित आरोपी प्रशांत पोपटराव मोरे, टॉम ऊर्फ विनोद पोपटराव मोरे, राहुल ऊर्फ रिबेल कुष्णांत यादव यासह एक अल्पवयीन अद्याप जेरबंद आहेत.