बारामती, 10 एप्रिलः यावर्षी कोरोना ची दोन वर्षानंतर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होत आहे. सर्व भीमसैनिक व बहुजन समाज जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी उत्सुक आहेत. या जयंतीमध्ये प्रशासनातर्फे कोणतीही उणीव राहू नये, म्हणून महावितरण अधिकारी, नगर पालिकेचे मुख्याधिकारी तसेच अग्निशमन दल प्रमुख, तहसीलदार कार्यालयातील प्रतिनिधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती शांतता कमिटीचे सदस्य यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये नगरपालिकेतर्फे मुख्याधिकारी रोकडे यांनी उत्सव समितीला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. खर्चामध्ये कुठलीही काटकसर केली जाणार नाही, असे आश्वासन दिले.
महावितरण अधिकारी यांनी सांगितले की, जयंती कालावधीमध्ये अतिरिक्त लोकांची नेमणूक करून कुठेही वीज पुरवठा खंडित होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. तसेच अचानकपणे काही प्रश्न निर्माण झाल्यास सर्व इलेक्ट्रॉनिक साहित्य अगोदरच आणून ठेवलेले आहे. तसेच उत्सव काळामध्ये रोषणाईमुळे विजेची अतिरिक्त गरज लागते आहे. त्यामुळे छोटे मोठे अपघात होतात, अतिरिक्त विजेची गरज वीज वितरण अधिकाऱ्याला समजून द्यावी, रोषणाईसाठी जे आपण कनेक्शन घेणार आहात, त्यासाठी विद्युत अधिकाऱ्यांची मंजुरी घ्यावी, असे सांगण्यात आले. त्यामुळे अतिरिक्त विजेचा दाब वाढून छोटे-मोठे अपघात होणार नाही.
फायर ब्रिगेड अधिकारी यांनी दोन फायर ब्रिगेड वाहने तयार राहतील, तसेच सिल्वर ज्युबलीचे अधिक्षक डॉ. काळे यांनी दोन ऍम्ब्युलन्स 13 आणि 14 एप्रिलला उपलब्ध राहतील, असे सांगितले.
पोलीस दलातर्फे चोख बंदोबस्त दिला जाईल. शहरांमध्ये जी पोस्टर्स लावलेली आहेत, ती पोस्टर्सची काळजी संबंधी कार्यकर्त्यांनी घ्यावी. तसेच प्रत्येक लावलेल्या पोस्टर्स ला व यापुढे लावण्यात येणाऱ्या पोस्टरला नगर पालिकेकडून परवानगी घ्यावी. त्यावरील मजकुराला पोलीस स्टेशनची परवानगी घ्यावी. पोस्टर लावताना कुणालाही वाहतुकीस किंवा व्यवसायात अडचण होणार नाही, याची काळजी घ्यावी. याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच स्टेज व स्वागत कमानीला सुद्धा नगरपालिकेची परवानगी घ्यावी. त्यानंतर पोलीस स्टेशनचा परवाना दिला जाईल.
प्रशासन हे जयंतीत कोणत्याही प्रकारे नैसर्गिक किंवा जाणीवपूर्वक उत्सवात व्यत्यय येणार नाही, यासाठी नियोजन करत आहे. त्यासाठी परवानग्या आवश्यक आहे. ज्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था बाधित होणार नाही. तसेच लोकांना अडचणी येणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी. आजारी पेशंट, विविध परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी यांचे सुद्धा अधिकारांनी रक्षण केले पाहिजे. उत्सव काळामध्ये सर्वांनी सर्व राजकीय सामाजिक मतभेद बाजूला ठेवून जयंती साजरी करावी. या कालावधीमध्ये जर तंटा भांडण झाले त्याची दखल उच्च पातळीपर्यंत घेतली जाते. त्यामुळे असे प्रकार घडल्यास पोलीस खात्यामार्फत गंभीर व तात्काळ दखल घेतली जाईल.
जयंती काळामध्ये कोणत्याही गुन्हेगार वृत्तीच्या लोकांबरोबर गुन्हा केल्यास नवयुवकांचे भावी आयुष्याला सुद्धा त्याचा परिणाम होतो, असे काही प्रमुख वक्त्यांनी नमूद केले . काही वक्त्यांनी सांगितले की आता अमराईमधून खूप अधिकारी तयार व्हायला लागलेली आहेत. लोकांमध्ये शैक्षणिक जाणीव निर्माण झालेली आहे. त्यामुळे सर्व प्रकारे कायदेशीर तरतुदींचे पालन केले जाईल, तसेच पोलिसांना सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले. यासह या बैठकीत आरपीआयचे शहराध्यक्ष अभिजीत कांबळे यांनीही महत्त्वाच्या सूचना मांडल्या.
उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच प्रशासनाने सुद्धा लोक सेवकाच्या भूमिकेत काम करण्याचे आश्वासन दिले बैठक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडण्यात आली. 14 एप्रिल रोजी एकच मिरवणूक निघेल असे सर्व आंबेडकरी विचारांच्या लोकांनी पोलिसांना आश्वासन दिले.