कासवांच्या स्थलांतरित हालचालींचा मागोवाला आले मोठे यश

रत्नागिरी, 5 एप्रिलः रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील वेळासमध्ये कासवांवर पहिले उपग्रह टॅगिंगचे करण्यात आले. कासवांच्या स्थलांतरित हालचालींचा मागोवा घेण्यासाठी हे उपग्रह टॅगिंग करण्यात आले होते. या उपग्रह टॅगिंगला आता यश आले आहे.

उपग्रह टॅगिंग केलेल्या पाच कासवांपैकी दोन ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांनी राज्याची सीमा ओलांडली आहे. राज्याच्या किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येणाऱ्या ऑलिव्ह रिडले कासवांना उपग्रह टॅगिंग केल्यानंतर पहिल्यांदाच त्यांच्या भ्रमणमार्गाचा पॅटर्न आणि स्वभावाची माहिती प्रकाश झोतात आली आहे.

राज्याच्या किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येणारे बहुतेक ऑलिव्ह रिडले कासव समुद्रात सरळरेषेत जात नसल्याचे निरीक्षण या अभ्यासात नोंदविले गेले आहे. दरम्यान, जानेवारीत सर्वप्रथम उपग्रह टॅगिंग केलेल्या ऑलिव्ह रिडले कासवाला ‘प्रथमा’ असे नाव दिले होते. ही प्रथमा सध्या गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर मुक्त संचार करत आहे. प्रथमाने आतापर्यंत समुद्रातील सुमारे 330 किलोमीटरचे अंतर पार केले आहे. या एकमेव कासवाने सरळ मार्गात समुद्र भ्रमंती सुरू ठेवली. सध्या ती दीव किनार पट्टीपासून 65 किलोमीटर समुद्रात आहे. प्रथमाने सुरुवातीपासूनच खोल समुद्रकिनाऱ्याची वाट धरली होती. ‘रेवा’ हे ऑलिव्ह रिडले कासव प्रथमानंतर समुद्राचे सर्वात जास्त अंतर कापणारे दुसरे कासव आहे. हे कासव सुरुवातीपासूनच दक्षिणेकडील समुद्राकडे प्रयाण करत आहे. रेवाने सुमारे 300 किलोमीटर अंतर पार केले आहे. आता ते कर्नाटकामधील कारवार शहरापासून 40 किलोमीटर समुद्रात आहे.

दरम्यान, गेल्या महिनाभरापासून ‘लक्ष्मी’ या कासवाचा संपर्क तुटला आहे. उपग्रहातील ट्रान्समीटरची क्षमता कमी असल्यामुळे संपर्क होत नसावा किंवा कासवाचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अथांग समुद्रात लक्ष्मीला शोधणे जिकरीचे काम आहे. मात्र, लक्ष्मीशी संपर्क होईल, अशी आशावाद शास्त्रज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

याशिवाय, ‘सावनी’ या ऑलिव्ह रिडले कासवाला गुहागर किनारपट्टीवर उपग्रह टॅगिंग करण्यात आले होते. मागील आठवड्यात या कासवाने नवी मुंबईच्या समुद्र किनारपट्टीपर्यंत प्रवास केला. मात्र ते पुन्हा दक्षिणेकडे परतले. आतापर्यंत या मादी कासवाने सुमारे 200 किलोमीटरची समुद्रभ्रमंती केली आहे. सध्या ते अंजर्ले किनारपट्टीपासून 100 किलोमीटर आत समुद्रात आहे. गुहागर समुद्रकिनाऱ्यावर ‘वनश्री’ या ऑलिव्ह रिडले कासवाला उपग्रह टॅगिंग केले होते. सुरुवातीपासूनच तिचे वास्तव्य गुहागर समुद्रकिनाऱ्याजवळ आहे. आतापर्यंत तिने दक्षिणेकडे 70 ते 100 किलोमीटर प्रवास केला आहे.

भारतीय वन्यजीव संस्थेतील शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, उपग्रह टॅगिंग केलेल्या चार मादी ऑलिव्ह रिडले कासवांचा राज्याच्या उत्तर दिशेकडे प्रवास झाल्यास ते दुबई, ओमान किंवा आफ्रिकेपर्यंत प्रवास करू शकतात. तीन कासवांनी दक्षिणेकडेच प्रवास करायला पसंती दिली आहे. ऑलिव्ह रिडले अरबी समुद्रातून हिंदी महासागरातही लक्षद्वीपपर्यंत प्रवास करतील. कदाचित उत्तरेकडे प्रयाण करणाऱ्या प्रथमा या कासवाचा प्रवासही कालांतराने दक्षिणेकडे होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *