कांद्याला 100 रुपये क्विंटल भाव

पैठण, 17 एप्रिलः कांद्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून घसरण होत आहे. यामुळे खर्च पण निघत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणच्या बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटल मागे 100 रुपये हा नीचांकी भाव मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. बाजारभाव वाढीसाठी तसेच निर्यातीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ पाऊलं उचलणं गरजेचं आहे, असे मत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी व्यक्त केले आहे.

गेल्या दोन वर्षांपासून निर्यातीसंदर्भात केंद्राने घेतलेल्या निर्णयाचा निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये देखिल मोठ्या प्रमाणावर कांदा तयार होत आहे. कांद्याची निर्यातही होत असल्याने त्यांनी भारतीय बाजारपेठ काबीज केला आहे. निर्यातीला चालना मिळण्यासाठी केंद्राने 10 टक्के अनुदान देणे अपेक्षित असतांना आता ते फक्त २ टक्के दिले जाते आहे. विशेष म्हणजे ट्रान्सपोर्ट खर्च कमी लागत असल्याने मध्यप्रदेशच्याही कांद्याची निर्यात चांगली होत असल्याचं होळकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कांद्याला पैठणच्या बाजार समितीत 100 रुपये क्विंटल नीचांकी भाव मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्या पाच वर्षांनंतर कांदा पुन्हा 100 रुपये क्विंटलवर आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. गेल्या दोन आठवड्यापासून कांद्याची आवक सतत वाढत आहे. आवक वाढल्यामुळे कांद्याच्या भावावर परिणाम झाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव नितीन विखे यांनी सांगितले. पैठण बाजार समितीत इतर ठिकाणांहून देखील कांद्याची आवक सुरू आहे. तीन दिवसांपूर्वी कांद्याला 200 ते 900 रुपये भाव मिळाला होता. मात्र सततच्या वाढत्या आवकमुळे कांद्याला 240 रुपयावरून थेट दोन दिवसांत 100 रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे.

पैठण बाजार समितीत पैठण तालुक्यासह इतर ठिकाणांहून देखील आवक होत आहे. तीन दिवसांपूर्वी कांद्याला 200 रुपये ते 900 रुपयांचा भाव मिळाला. मात्र आज कांद्याला 100 रुपये क्विंटलची लिलावात बोली लागली. हा भाव म्हणजे 1 रुपये किलोप्रमाणे कांदा गेला. यात कांद्याच्या लागवडीसाठी जो पैसा लागला तोही निघाला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शुक्रवारी पैठण तालुक्यातून अडीच हजार कांद्याच्या गोण्या लिलावासाठी बाजार समितीत आल्या. रोजच्या तुलनेत शुक्रवारी कमी कांदा आला तरीही भाव कमी मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *