बारामती, 30 मार्चः बारामती शहराला नगर परिषदेकडून पाणी पुरवठा करण्यात येत असतो. सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू झाल्याने पाणी जपून वापरण्याचे आवाहन बारामती नगर परिषदेकडून नागरीकांना करण्यात येते. मात्र शहरात याचे उलटे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. बारामतीकरांचे पिण्याचे लाखो लिटर पाणी सध्या वाया जाताना दिसत आहे. विशेष म्हणजे हे पाणी बारामती नगर परिषदेजवळच वाया जात आहे.
बारामती शहरातील नगर परिषदेसमोरून जाणाऱ्या भिगवण रोडवर तीन हत्ती चौकाजवळील जुनी पाईपलाईन फुटली आहे. या फुटलेल्या पाईपलाईनमधून आतापर्यत लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. नगर परिषदेचे पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांचे याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सामान्य नागरीकांकडून होत आहे. तसेच फुटलेल्या पाईपलाईनमधील पाणी भिगवण रोडवर येत आहे. यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना याचा त्रास होत असून अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.