अखेर एमपीएससीचा ‘तो’ निकाल चार वर्षांनी जाहीर

पुणे, 3 एप्रिलः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) विविध पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात. या राबवल्या जाणाऱ्या पदभरती परीक्षांची प्रक्रिया रखडत असल्याबाबत उमेदवारांकडून सातत्याने नाराजी व्यक्त करण्यात येते.

सध्या याचेच एक उदाहरण समोर आले आहे. एमपीएससीमार्फत घेलेल्या महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब विभागीय परीक्षा 2017 या भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षेचा निकाल चार वर्षांनी नुकताच जाहीर करण्यात आला आहे.

या बाबतची माहिती एमपीएससीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब विभागीय परीक्षा 2017 च्या लेखी परीक्षेतील एकूण 283 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. या मुलाखतीचे वेळापत्रक एमपीएससीकडून लवकरच जाहीर करण्यात येईल. विविध न्यायिक प्रकरणांतील न्यायनिर्णयांच्या अधीन राहून लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. उमेदवारांनी मुलाखतीसाठी येताना सर्व मूळ कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. परीक्षा दिलेल्या उमेदवारांना गुणांची फेरपडताळणी करायची असल्यास गुणपत्रके ऑनलाइन खात्यात पाठवल्याच्या दिनांकापासून एमपीएससीकडे दहा दिवसांत अर्ज करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *