अवकाशातल्या घटनांनी राज्यातले नागरिक चकित झाल्याचे दिसले. आकाशातून शनिवारी संध्याकाळी आणि रात्री राज्याच्या विविध भागात प्रकाशमान आगेचा लोळसदृश जाताना दिसले.
या घडामोडीने अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं. हा उल्कापात आहे की उपग्रहाचे तुकडे आहेत, की एखाद्या देशाने भारतावर लक्ष ठेवण्यासाठी, कूटमोहीम तर केली नाही ना, अशा अनेक शंकांवर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक भागात शनिवारी रात्री आकाशातून जलदगतीने काही लाल रंगाच्या वस्तू खाली येत असल्याचं स्थानिकांना दिसले. दरम्यान, सिदेवाही तालुक्यातील लाडबोरी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागे रात्री 7 वाजून 45 मिनिटांनी एक धातूची रिंग कोसळली. ही रिंग जेव्हा आकाशात होती, तेव्हा ती लाल तप्त होती. जमिनीवर ती ऐवढ्या जोरात आढळली की ती मातीमध्ये रुतली. ही रिंग आठ फुट व्यासाची असून स्थानिकांनी एकत्रित येत पोलीस स्टेशनला ती जमा केली आहे.
नागपूर शहरातून आकाशात शनिवारी संध्याकाळी 7 वाजून 47 वाजता रहस्यमय प्रकाश दिसला. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास पाच ते सात प्रकाशाचे भाग आकाशातून जाताना दिसले. नागपूर शहरातील अनेक भागातील लोकांनी हा प्रकाश पाहिला. अनेकांनी आकाशातील प्रकाशाचे फोटो आणि व्हिडिओ मोबाईलमध्ये काढले. हा प्रकाश जवळपास 15 सेकंदापर्यंत आकाशात दिसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी माध्यमांना सांगितले.
शनिवारी रात्री आकाशात दिसलेल्या रहस्यमय प्रकाशाचं गूढ वाढलं आहे. एकीकडे काही स्थानिक कुतुहूल व्यक्त करत असताना काही जण मात्र संभ्रमात आहेत. या घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
आकाशात घडणाऱ्या या घडामोडींबद्दल नागरिकांना कुतुहल निर्माण झाले आहे. नागपुरात रामदासपेठ. बेसा, जयताळा, आणि इतर अनेक भागात आकाशात हे प्रकाशाचे गोळे दिसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अनेकांनी या व्हिडिओचे फोटो आणि व्हिडिओ काढले. नागपूरच नाही तर खामगाव, यवताळ, भंडारा, अमरावती येथील नागरिकांनीही या घटनेचे व्हिडिओ मोबाईलवर एकमेकांना पाठविले.